सरपंच बदलला अन् कोनशीलाही काढून टाकली!आ.सुभाष बापूंच्या मतदारसंघात काँग्रेसची कुरघोडी
भाजपात इनकमिंग होणार्यांचे आतापासूनच प्रताप,सामान्य कार्यकर्ते अस्वस्थ

(विजयकुमार पिसे)
भाजपा दिवसेंदिवस प्रचंड विस्तारत आहे, इनकमिंगची वेटींग लिस्ट खूप मोठी आहे. पण हे इनकमिंग पक्षात येण्यापूर्वीच कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. आ. सुभाष देशमुखांच्या मतदारसंघातील जि.प.आरोग्य केंद्राचे उद्घाटन झाले, हस्तांतरणही झाले. पण गावचा सरपंच बदलताच काँग्रेसने संधी साधली. आरोग्य केंद्रातील कोनशीला काढून टाकली. विशेष म्हणजे सत्ता भाजपाची असूनही ना पोलिसात दाद, ना जि.प.,पंचायत समितीकडून दखल. अगदी नाकावर टिच्चून हा प्रक़ार घडलाय सोलापूरपासून फक्त 16 कि.मी.अंतरावरील एका गावात.
होटगी स्टेशन (जंक्शन) येथील नियोजित आरोग्य उपकेंद्राचे चार महिन्यापूर्वी हस्तांतर झाले. तत्पूर्वी दक्षिण सोलापूरचे विद्यमान भाजपा आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या नावाची कोनशीला येथे लागली होती. दुर्दैवाने गावचे सरपंच जगन्नाथ गायकवाड यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला, तो मंजूर झाला. सरपंच म्हणून विरोधी गटाचे नीलम भोसले यांची निवड झाली. अविश्वास आणि नवीन सरपंच या राजकीय घडामोडी मार्च ते एप्रिल दरम्यान झाल्या. भाजपाचे गायकवाड यांना सरपंच पदावरून हटवल्यानंतर उपसरपंच सुभाष पाटोळे यांनी आरोग्य कर्मचार्यांना पाचारण करून आरोग्य उपकेंद्राच्या चाव्या घेतल्या आणि याठिकाणी लावण्यात आलेली कोनशीला काढून (फोडून) टाकली.
पाटोळे हे नुकत्याच झालेल्या सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा पॅनलमधून संचालक निवडून आले आहेत. तिथे आता दिलीप माने सभापती आहेत. या बाजार समितीचे निर्वाचित संचालक लवकरच भाजपावासी (इनकमिंग) होणार अशी चर्चा जोरात सुरू आहे. सभापती माने यांनी कालच 6 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विमानतळावर भेट देखील घेतली. ही मंडळी भाजपात येण्यापूर्वीच भाजपा आमदारांच्या मतदारसंघात कुरघोडी करत असतील तर इनकमिंगनंतर त्यांना रान मोकळे होणार? ही स्थिती होण्याची भीती कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत असून पोलीस आणि प्रशासनही भाजपा कार्यकर्त्यांच्या बाजूने नाही. असाच कारभार असेल तर भविष्यात भाजपा कार्यकर्त्यांच्या पदरात काय वाढून ठेवले जाईल, त्याचे हे अस्वस्थ करणारे जिवंत उदाहरण.
जगन्नाथ गायकवाड हे भाजपा किसान आघाडीचे जिल्हा अध्यक्ष असून त्यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार 27 जून रोजी उपसरपंच पाटोळे यांनी कायदा हातात घेत रात्री चावी घेऊन आरोग्य उपकेंद्र येथे दोन मजूर लावले. आणि आ. सुभाष बापू देशमुख यांचा शिलालेख फोडून काढला आहे. यामध्ये ग्रामसेवक कांतू राठोड व आरोग्य उपकेंद्र कर्मचारी यांचीही साथ आहे. संबंधितांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी करणारे पत्र 27 रोजी वळसंग पोलीस ठाण्यात दिले आहे. तसेच जि.प.सीईओ व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही निवेदन दिले आहे. शासनाच्या ताब्यात आयुष्य आरोग्य उपकेंद्र दिल्यानंतरही अनाधिकाराने काँग्रेसच्या मंडळींनी रातोरात कुलूप उघडून विद्यमान आमदाराच्या नावाची कोनशीला काढून टाकली. याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी गायकवाड यांनी केली आहे.
What's Your Reaction?






