आषाढी वारी 2026 : 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अर्थसाह्य, 2.80 कोटी निधी मंजूर
आषाढी वारी 2026 साठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य, 2.80 कोटींचा निधी मंजूर. मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत होणार वितरण.
पंढरपूर : पुढील आठवड्यात संत ज्ञानोबा आणि संत तुकोबांच्या पालख्या पंढरीच्या वारीसाठी मार्गस्थ होत असून राज्य सरकारने वारीत सहभागी १४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अर्थसाह्य जाहीर केले आहे. यासाठी २.८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला. या आठवड्यात बुलढाण्यातून श्री संत गजानन महाराज, जळगावहून संत मुक्ताई आणि त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ पालखीचे प्रस्थान झाले आहे. आता आळंदी आणि देहूकडे वारकर्यांचे लक्ष लागले आहे. ७तारखेला देहूवरून तर दुसर्या दिवशी आळंदी येथून मोठा पालखी सोहळा मार्गस्थ होईल. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरच्या वारीत सहभागी होत असल्याने त्यांच्या सुविधांसाठी राज्य सरकारकडून २०२४मध्ये मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. या महामंडळामार्फत सलग तिसर्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे.
यंदा मानाच्या दहा पालख्यांसोबत पंढरपूरकडे जाणार्या १४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेसाठी लागणारा २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने उपलब्ध करून दिला आहे. अनुदानाचे वितरण मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत करण्यात येणार असून त्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे प्रशासकीय जबाबदारी सोपविली आहे. येत्या २५ जुलै रोजी पहाटे आषाढी एकादशी सोहळा असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाची शासकीय महापूजा पंढरीत होईल.
What's Your Reaction?