मनपा बजेटच्या आकड्यांचा अजूनही खेळ सुरू!
नागरिकांकडून मागविलेल्या सूचना गुलदस्त्यात, मनपा पदाधिकार्यांना विशेष निधी, ही काँग्रेसी संस्कृती. भाजपा, काँग्रेसमध्ये फरक काय?
(विजयकुमार पिसे)
चार वर्षीय प्रशासकीय राजवट संपवून सत्तेवर आलेले लोकप्रतिनिधींचे अद्याप बस्तान बसलेले दिसत नाही. कारण सोलापूऱ महापालिकेत सादर केलेले बजेट लोकहिताचे, लोकांना प्रभावित करण्याचा दावा सत्ताधार्यांनी केला खरा. पण यामध्ये कोणते लोकहित साधले गेले, ही माहिती जनतेसमोर आलीच नाही.तसेच बजेट पुस्तकात देखील जनतेच्या सूचनांचा उल्लेख आलेला नाही. अजूनही बंद खोलीत आकड्यांचा खेळ चालू आहे.
महापालिकेचे बजेट गेल्या महिन्यात 30तारखेला मनपा सभेत मंजूर झाले. त्यास अनुसरून समिती सभापतींनी आदर्श बजेटची भूमिका सभागृहात मांडली. यामध्ये कोणता आदर्श आहे, हे जनतेला माहीत होणे अपेक्षित असून शहरभर डिजीटल फलक लावून जाहीर आवाहन केले होते. यासंदर्भात किती नागरिकांनी सूचना मांडल्या, त्या कोणत्या आणि यापैक़ी किती सूचनांचा स्वीकार झाला, याची माहिती मनपाने जाहीर केलेली नाही. मनपात सत्ताधार्यांकडे पाशवी बहुमत, विरोधक दुबळा, त्यांना कुणीही विचारत नाही. अनेक हेडवर रक्कम ठेवल्याचे जाहीर करण्यात आले. प्रशासना कडूनही आकडे आले आहेत. यापैकी बरीच मोठी रक्कम विकासाच्या नावाखाली पदाधिक़ार्यांनी आपल्या सोयीसाठी राखीव ठेवल्याचे दिसते.
मनपा पदाधिकार्यांना विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. वास्तविक. भाजपाचा विशेष निधीस पूर्वीपासूनच ठाम विरोध, काँग्रेस सत्तेच्या काळात मात्र अशी परंपरा चालू झाली, तेव्हा सभागृहात काँग्रेस आणि भाजपात खडाजंगी दिसे. जहरी टीका होत असे. प्राप्त माहितीनुसार प्रत्येकी 66 लाख रु.,शिवाय महापौर 5 कोटी,उपमहापौर 3 कोटी,स्थायी समिती 3 कोटी, सभागृह नेता 3 कोटी. अशी एकूण 14 कोटी रुपयांची विशेष तरतूद विकास कामाच्या नावाखाली केली आहे. अशी रक्कम तरतूद करणे म्हणजेच काँग्रेसी संस्कृती होय. त्यामुळे भाजपाची काँग्रेस झाली आहे. त्याच स्टाईलने नवभाजपायी काम करत आहेत.
सोलापूर महापालिकेचे बजेट मंजूर झाले असे सांगितले गेलेे, सभागृहात एकमताने ठराव पारीत जरी झाला. पण प्रत्यक्षात अंतिम बजेटचे काम अजून अंतिमत: पूर्ण झालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे संपूर्णत: प्रशासनाकडे ठरावासह बजेटपूर्ती होण्यासाठी किमान आठवडा लागेल, अशी माहिती आहे. या विलंबाचे कारण म्हणजे, प्रचंड बहुमत असले तरी सत्ताधार्यांकडे या विषयाची तज्ञ मंडळी अभावाने नाहीत. पूर्वी भाजपाचे संख्याबळ कमी होते, ताकद देखील कमी होती. पण बजेटच्या बाबतीत विरोधक म्हणून भाजपाचा अभ्यास पक्का असायचा. आता विसंगत चित्र आहे.
सभागृहात बहुमत पाशवी पण अभ्यास कच्चा. त्यामुळे वेळ मारून नेण्यासाठी अर्थात कुणी हरकत घेउ नये यासाठी पॅकेज सिस्टीमचा अवलंब होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदा बजेट सादरीकरणावर आलेल्या वार्ता, माहिती, प्रचार,प्रसार,सोशल मिडियावर अगदी स्वागतार्ह अशाच स्वरूपाच्या होत्या. तेव्हा सोलापूरकरांनाही काहीसे आश्चर्यच वाटले. कारण छान,छान बजेट आणि स्वागतार्ह बजेट, लई भारी बजेट अशाच प्रतिक्रिया व माहिती बाहेर आलेली दिसत होती.
What's Your Reaction?