पाटी कोरी। धुरंधर नाही कुणी भाजपात...

प्रदेश समितीच्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील नेते वंचित,1991पासून भाजपा दमदार, केंद्रीय गृहमंत्री,मुख्यमंत्र्यांची पत्नी,दुग्धविकास मंत्री,चाकोते, युनुसभाई,म्हेत्रेंसारखे दिग्गजांना पाणी पाजणारे नेतृत्व सोलापुरी मातीत. Jjnñ हीच मुद्द्याची गोष्ट...

Apr 22, 2026 - 00:38
 0  166
पाटी कोरी। धुरंधर नाही कुणी भाजपात...

(विजयकुमार पिसे)

मोदींचा चौकार मारण्यासाठी 2029 ची तयारी तीन वर्षे आधीच सुरू आहे. आधी लगीन कोंढाण्याचे या भूमिकेतून अनेक भाजपा नेते,कार्यकर्ते यांनी आतापासूनच कंबर कसलीय. यामध्ये सोलापूर मागे का राहील? दुर्दैवाने प्रदेश नेत्यांना याची जाणीव नसावी. म्हणून 21 एप्रिल रोजी जाहीर केलेल्या प्रभारींच्या यादीत सोलापूर जिल्ह्यावर बाहेरचे नेतृत्व लादले आहे. मात्र या जिल्ह्यातील एक़ही नेता,कार्यकर्ता यांना प्रभारींच्या यादीत स्थान मिळालेले नाही. सोलापूर जिल्हा भाजपाची पाटी कोरी आहे. कारण इथे कुणी नाही धुरंधर? किंवा या मातीतून कुणी धुरंधर होऊ नये, असे धोरण तर नसावे. असो.

   मुंबई प्रदेश कार्यालयातून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रदेश स्तरावरील जिल्हा, मतदारसंघ निहाय प्रभारी आणि प्रवक्ते यांची यादी/टीम जाहीर केली. 56 जिल्हयांसाठी प्रभारी नियुक्त केले आहेत. सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण पूर्व आणि पश्‍चिम (माढा) या तीन भागासाठी अनुक्रमे योगेश टिळेकर, गोपीचंद पडळकर, संजय जगताप या नेत्यांची नियुक्ती केली आहे. या यादीत सोलापूर जिल्ह्याला स्थान मिळालेय का याचा शोध घेतला. दुर्दैवाने यामध्ये सोलापुरी भाजपा नेते वंचित राहिल्याचे दिसून आले.

*हा भाजपाचा सुवर्णकाळ...*

   1980 मध्ये भाजपाची स्थापना झाली. पाच वर्षातच सोलापूर मनपा निवडणुकीत भाजपाने फिफ्टी फिफ्टी सत्ता मिळवली. पुलोदचा प्रयोगही यशस्वी करून दाखवला. किशोर देशपांडे महापौर झाले. 1991 मध्ये स्थायी समिती सभापती लिंगराज वल्याळ यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते बाबुराव चाकोते यांना पराभूत केेले.(श्री.वल्याळ प.महाराष्ट्रातील पहिले आमदार). 1995 मध्ये हाच कित्ता पुन्हा गिरवला. शिवाय पवार समर्थक मुकेश अब्दुलपूरकर यांनाही पराभूत केले.1995 मध्ये लोकसभेत श्री वल्याळ कडून विद्यमान काँग्रेस खा.धर्मण्णा सादूल व इंडीचे दिग्गज आ.रवीकांत पाटील देखील पराभूत. 1997 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपाकडे कसलेही बहुमत नाही, या आकड्यांच्या जवळपास देखील भाजपा नाही. वल्याळ यांच्या रणनीतीने भाजपाचे सुभाष देशमुख यांनी चमत्कार घडवला. आणि पवार समर्थक दिग्गज आ.युनुसभाई शेख पराभूत. 2003च्या पोटनिवडणुकीत गोपीनाथराव मुंडे यांनी धाडस करून प्रतापसिंह मोहिते पाटलांना मैदानात आणले. दुग्धविकासमंत्री आनंदराव देवकतेंना राजकीय जीवनात प्रथमच हार मानावी लागली. पुढे देवकतेंंचा राजकीय अस्त झाला.

   2004 मध्ये वल्याळ यांनी मुंडे/महाजन यांना साद घालून बळेबळेच सुभाष देशमुखांना लोकसभेेसाठी उभे केले. नाईलाज म्हणून लढलेले सुभाषबापूंनी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती उज्वलाताई सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करून जायंट किलर ठरले.

काँग्रेसी बालेकिल्ल्यात अक्कलकोटमध्ये रेवणसिध्द खेडगी यांनी प.महाराष्ट्रात पहिला नगराध्यक्ष, तर सुरेश पाटील पहिला पंचायत समिती सभापती आणि बाबासाहेब तानवडे यांनी दोन वेळा नामुष्की होउन देखील रणांगण सोडले नाही. विधानसभेत 1995 मध्ये पहिल्यांदा भाजपाचा झेंडा फडकवला. तीन टर्म आमदार,गृहराज्यमंत्री भूषविलेले सिध्दाराम म्हेत्रे यांना (2009) सिद्रामप्पा पाटील यांनी व पुढे सचिन कल्याणशेट्टी (2019/2024) यांनी सलग दुसर्‍यांदा पाणी पाजले.

    2004 मध्ये विजयकुमार देशमुख यांनी सुरू केलेली विजयपताका सलग पाचवेळा नॉनस्टॉप सुरू आहे. देशमुखांनी दिग्गज विश्‍वनाथ चाकोते यांना दोनदा विजयी सलामी देत चाकोतेंचे डिपॉझिट देखील ठेवले नाही. (श्री नरसिंग मेंगजीकडूनही पोट निवडणुकीत चाकोतेना झटका). 

  दक्षिण सोलापुरात सुभाषबापूंनी आणखी एकदा चमत्कार घडवत दिग्गज विद्यमान आ.दिलीप ब्रह्मदेव माने यांना पराभूत केले. 2009 मध्ये पराभवानंतरही निराश न होता, अ‍ॅड.शरद बनसोडे यांनी 2014 मध्ये परतफेड करताना देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना झटका दिला. 2019 मध्ये डॉ.जयसिध्देश्‍वर महास्वामी यांनीही तोच कित्ता सुशीलकुमारांबाबत घडवला. 2017 मध्ये स्वबळावर भाजपाने मनपा ताब्यात आणली. या दरम्यान आ.दीपक आबा साळुंके यांना प्रशांत परिचारक यांनी स्थानिक स्वराज्य मतदारसंघात पराभूत केले होते.

   स्वर्णकाळाची ही यादी इतकीच नाही... 2002 मध्येे गुजरातेत मुख्यमंत्री मोदींची पहिली निवडणूक जिंकण्यासाठी सोलापुरी भाजपाने तीन आठवडे सुरत, गांधीनगर, अहमदाबाद येथे तळ ठोकला. या टीममध्ये वल्याळ, रामचंद्र जन्नू, राजाराम गुर्रम, विजयकुमार पिसे, श्रीनिवास दायमा आणि अन्य कार्यकर्ते होते. राजस्थानात वसुंधरा राजे (झालरापाटण) यांच्यासाठी आणि राहुल गांधी यांच्या अमेठीत *विक्रम देशमुख, *दत्तात्रय गणपा व अन्य कार्यकर्ते यांनी बूथ निहाय यंत्रणा कशी आखावी याचे *गमक तेथील *भाजपायींना दाखवले. वसुंधरा राजे सीएम झाल्या. अमेठीत राहुलजी प्रथमच पराभूत झाले. मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र,तेलंगाणा, छत्तीसगढ या राज्यांमध्येही स्थानिक कार्यकर्त्यांनी या परप्रांतात बूथ यंत्रणेचे प्रशिक्षण देऊन भाजपाची सत्ता आणण्यात योगदान दिले.

   सोलापूर शहर जिल्ह्यात 1985 पासून भाजपाचा स्वर्णकाळ आहे. तरी देखील विद्यमान प्रदेश भाजपा अध्यक्ष/पदाधिक़ारी सोलापूर शहर व जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते यांना अस्पृश्य का मानत असावेत. हा चिंतनाचा आणि चिंतेचा विषय होऊ शकेल का? हीच *मुद्द्याची गोष्ट!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow