महायुतीतच कुरघोडींचा कळस; विरोधकांशिवायच सत्ताधाऱ्यांचे ‘विकेटस’
मनपात निष्ठावंत विरुध्द गेटकेन,सातार्यात पालकमंत्री जखमी, एनसीपीचा तिसरा बळी; शिस्तबध्द घर आणि बेशिस्तीचा कहर
(विजयकुमार पिसे)
सत्ताधारी महायुतीमध्येच साठमारी,लठ्ठालठ्ठी होत राहिली तर सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची आवश्यकताच राहिली नाही. त्यामुळे विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनदेखील विरोधी पक्षनेत्याशिवाय सुरळीतपणे पार पडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकरांना शुक्रवारी रात्री राजीनामा द्यावा लागला. गत दीड वर्षात त्यांच्या पक्षाच्या तीन नेत्यांचे राजकीय बळी गेले. सातारचे पालकमंत्री शंभुराज देसाई (शिंदेसेना) यांना सातारा जि.प.आवारामध्ये झटापटीत जखम झाली.तर एनसीपीचे दुसरे मंत्री मकरंद पाटील हतबल झाले. या गदारोळात भाजपाच्या मंत्र्यांनी जि.प.ची सत्ता हस्तगत केली. सोलापूर मनपा सभेत निष्ठावंत विरुध्द गेटकेन संघर्ष पहायला मिळाला. त्यामुळे निष्ठावंत नगरसेवकांनी सभात्याग करून शिस्तबध्द भाजपाला घरचा आहेर दिला.
सुसंस्कृत महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षांमध्ये राजकीय कुरघोडींमधून अशा घटना एकाच दिवशी घडत असतील, तर कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र असा सवाल कुणी उपस्थित केला तर आश्चर्य वाटणार नाही.
कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी रोज नवीन व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे शीर्षस्थ नेत्या रूपालीताई चाकणकरांची आणि एनसीपीची पुरती बदनामी झाली. डोक्यावरून पाणी जातंय हे लक्षात आल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना आदेश द्यावा लागला. चाकणकर यांनी महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. रात्री उशीरा चाकणकर मिडियासमोर प्रकटल्या. आपला राजीनामा पक्षाध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे सुपूर्द केला असे त्यांनी सांगितले. या प्रक़रणात विरोधी पक्षांना फारसा आवाज उठवावा लागलाच नाही. पण सत्ताधार्यांचे पुरते वस्त्रहरण झाले. संजय राऊतानी सरकारमधील 9 मंत्री,नेते भोंदूबाबाचे भक्त आहेत, असा दावा केला. तसेच काही बड्या राजकीय नेत्यांची छायाचित्रे देखील व्हायरल झाली होती.
बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख प्रक़रणात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गतवर्षी राजीनामा दिला. या पदावर दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांना अशाच पध्दतीने पायउतार व्हावे लागले. आणि आता रूपालीताई चाकणकर यांनाही जावे लागले. गत वर्षभरात राष्ट्रवादीच्या तीन नेत्यांची गच्छंती झाली. विरोधी पक्ष अल्पसंख्य आहे. त्यामुळे त्यांना घटनात्मक रितीने विरोधी पक्षनेतेपद देता येत नाही. पण विरोधकांच्या हल्ल्याशिवाय सत्ताधार्यांची विकेट पडत आहे. महायुती मजबूत असूनही त्यांच्या कुरघोड्या म्हणजे.. कुठे नेवून ठेवला...।
सातारा जि.प. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत जि.प.आवारातच सत्ताधारी भाजपा,शिंदे सेना आणि एनसीपीमध्ये राडा झाला. या झटापटीत पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हाताला जखम झाली. एनसीपीचे दुसरे मंत्री मकरंद पाटील हे हतबल झाले होते. सत्ताधार्यांचीच मते फोडून बहुमत नसतानाही भाजपाने दोन्ही पदे पटकावली. सहकारी पक्षांवर कुरघोडी झाली. राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे,सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेेंद्रसिंह राजे आणि माजी खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची सरशी झाली.
भाजपातच मठ मंदिर वाद विकोपाला
विरोधी पक्षांची कोंडी करून महापौर विनायक कोंड्याल यांनी शुक्रवारी तब्बल 52 विषय मंजूर करून मनपा सभेत आपला ठसा उमटवला. ही एक बाजू. पण सत्ताधारी भाजपात निष्ठावंत आणि गेटकेन सामना रंगला. प्रशासनाचा विषय बाजूला ठेवून सभासद प्रस्ताव अजेंड्यावर आणण्यात सत्ताधारी भले हुश्यार ठरले. पण आपणच आपल्या घरचे वासे मोजतोय याचे त्यांना भान राहिले नसावे. अक्कलकोट रोडवरील लिंगायत समाजासाठीची नियोजित स्मशानभूमीची जागा होटगी मठ की सिध्देश्वर देवस्थान यांना देण्यावरून गेटकेन भाजपायींचा दुराग्रह होता. मठ की मंदिर हा वाद उपस्थित करून गेटकेन भाजपायी असंस्कृती रक्षणाचे दर्शन घडवत होते. तेव्हा सभागृहात नेतेमंडळी कोणाच्या बाजूने होते? विशेष म्हणजे काही नवभाजपायी या सार्या कामकाजाचे लाईव्ह व्हिडिओ नेत्याना दर्शन घडवण्यात दंग होते. सभागृहात विरोधी पक्षांचा विरोध कमी, पण कुरघोडी भाजपात अधिक़ होती. एरवी विरोधी पक्ष सभात्याग करतो. सोलापुरात मात्र सत्ताधारी पक्ष भाजपा नगसेवक सभात्याग करतात. त्यामुळे सोलापूरकरांनाही प्रश्न पडलाय, कुठे नेवून ठेवलाय...?
What's Your Reaction?