मुख्यमंत्री फडणवीस आज सोलापुरात: आ.कोठे

भाजप विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळा जय्यत तयारी आ. देवेंद्र कोठे यांनी पोलीस प्रशासना समवेत केली तयारीची पाहणी : विजयी मेळावा आणि कृतज्ञता सोहळ्यात सहभागी होण्याचे सोलापूरकरांना आवाहन

Apr 28, 2026 - 00:28
 0  120
मुख्यमंत्री फडणवीस आज सोलापुरात: आ.कोठे
मुख्यमंत्री फडणवीस आज सोलापुरात: आ.कोठे

सोलापूर : भारतीय जनता पार्टीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी १२ वाजता होणाऱ्या विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी सायंकाळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी पोलीस प्रशासनासमवेत सभेच्या स्थळाची पाहणी केली.
    यावेळी पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, पोलीस उपायुक्त गौहर हसन, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त पंडित, सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर उपस्थित होते.
   आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना दिलेल्या शब्दानुसार दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी १३७८ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहत आणि होटगी रोड औद्योगिक वसाहतीसाठी ५६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. सोलापूरकरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आयटी पार्क आणि सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विषयदेखील मार्गी लागला आहे. उजनी धरण येथे फ्लोटिंग सोलार पी व्ही बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली व शाश्वत एआय कॅम्पसकरिता तब्बल एक लाख २८ हजार ८८३ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार झाला आहे. सोलापूरकरांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका निवडणुकीत सोलापूरकरांनी भाजपाला भरभरून मतदान केले आहे. निवडणुकीत भाजपाला दिलेल्या यशाबद्दल सोलापूर शहर जिल्ह्यातील मतदारांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या सत्कारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात येत आहेत.

विकासाच्या सोहळ्याचे होऊया साक्षीदार : आमदार देवेंद्र कोठे
सोलापूर शहर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास मोठ्या प्रमाणावर होत असताना या विकासाच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी सोलापूरकरांना मिळाली आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळ्यासाठी भाजपाच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि शहर-जिल्हावासियांनी उपस्थित रहावे आणि विकासाच्या सोहळ्याच्या साक्षीदार व्हावे.


भाजपाच्या यशाचे कौतुक : महापौर कोंड्याल
भारतीय जनता पार्टीला सोलापूर महानगरपालिकेसह जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकांमध्येही मिळालेल्या भरघोस यशाचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. या सोहळ्यात शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. 

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी चोख व्यवस्था
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवारी होणाऱ्या सभेसाठी १०० बाय ३०० फुटांचे तीन भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. तर सभेचे व्यासपीठ ४० बाय ६० फुटांचे व्यासपीठ असणार आहे. २० हजार जणांना बसण्याकरिता खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच ५०० सोफे देखील ठेवण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांची सभेसाठी विशेष सूचना
सभेला येणाऱ्या सोलापूरकरांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नागरिकांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी १०० मोठे कुलर लावण्यात आले आहेत. तसेच ४ टनचे ६ वातानुकूलित यंत्रणा उभारण्यात आली आहे. सभास्थळी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून ३० हजार पाण्याच्या बाटल्या आणि २०० पाण्याचे जार अशी मुबलक व्यवस्था करण्यात आली असून खबरदारीचा उपाय म्हणून सभेस्थळी रुग्णवाहिका तसेच डॉक्टरांचे पथकही राहणार आहे, असे आ. देवेंद्र कोठे यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow