कही पे निशाना.. विरोधकांचे निलंबन, स्वकीयांना इशारा!

निरुत्तरीत प्रश्‍न अनेक; वाढीव खर्चाच्या पाणी योजनेचा कुणाला फटका,11मधून मोर्चा कुणी आणला. प्र.4 असो वा आकाशवाणी परिसर पाणी पेटलेलेच. घंटागाडी आठवडाभर येत नाही. आणि ...नियमित कर भरणार्‍या करदात्यांची व्याख्या काय?

Apr 21, 2026 - 01:02
Apr 21, 2026 - 20:09
 0  32
कही पे निशाना.. विरोधकांचे निलंबन, स्वकीयांना इशारा!

 (विजयकुमार पिसे)
सोलापूर: सोलापूरच्या पाणी पुरवठ्याची 892कोटींची योजना 1378 कोटींची करण्यात आली. यामध्ये सोलापूरकरांवर छुप्या मार्गाने करवाढ लादली जाणार या भीतीने सर्वप्रथम आ.विजयकुमार देशमुख आणि आ.सुभाष देशमुख यांनी आवाज उठवला. मग सत्ताधाऱ्यांची भागमभाग सुरू. दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्र परिषद घेत भूमिका स्पष्ट केली आणि माहिती घेऊन वक्तव्य करा, असा शब्दप्रयोग करीत दोन्ही स्वकीय आमदारांना सुनावले. 

   मनपा सभेत राडा घातल्याबद्दल शिवसेनेचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे यांना निलंबित केले. आधी आवाज कुणी उठवला, इकडे सारवासारव आणि इशारा.. या सार्‍या घडामोडी आता निर्णायक वळणावर आल्या आहेत.

   वाढीव कर्जाची आणि खर्चाची पाणी पुरवठा असो वा स्मशानभूमी जागेचा वादग्रस्त ठराव यामध्ये सत्ताधारी भाजपाच एकमेकांना तोंडघशी पाडत आहे. जनता आणि प्रामाणिक पक्ष कार्यक़र्त्यांच्या बरोबर कोण आहेत, हे देखील एव्हाना जनतेला कळून चुकले आहे. पण बाहुबली सत्तेचा अंकुश ठेवण्याचा प्रयत्न कुस्तीच्या दिशेने उघड आहे. त्यामुळे घरचा आहेर देण्याची मालिका खंडित होत नाही. पक्षाचे विभाग संघटन मंत्री यांना या सार्‍या घडामोडींकडे दुर्लक्ष करा, असेच सांगितले असावे. कारण त्यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे.

   सोमवारी मनपा सभेच्या पृष्ठभूमीवर प्र.11 मधून पाण्यासाठी मनपावर मोर्चा काढण्यात आला. येथील भाजपा नगरसेवक अजय पोन्नम मोर्चेकर्‍यांसोबत होते. प्र.4 चे नगरसेवक विनायक विटकर यांनीही प्रभागातील पाण्याबाबत आयुक्तांचे लक्ष वेधले. तसेच आकाशवाणी भागातील रहिवाशांनीही आठवड्यापासून पाणी व घंटागाडी येत नाही, अशी तक्रार सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडे जाहीरपणे केली. रस्ते भ्रष्टाचारावरून प्र.7 च्या नगरसेविका श्रध्दा पवार मनपा सभा सुरू होण्यापूर्वीच सकाळी कौन्सील हॉलसमोर उपोषणास बसल्या होत्या. हे सारे चव्हाट्यावर येत आहे.

   सत्ताधारी मंडळीच पालिकेच्या कारभारावर लक्ष वेधून घेत आहेत. तर सत्ताधारी कारभार्‍यांनी विरोधकांवर (नरोटे/शिंदे)निलंबनाची कुर्‍हाड चालविली. या सार्‍या घडामोडींचे पुढचे लक्ष्य स्वकीयच असू शकतील. त्यांच्यासाठी म्हटले तर इशारा होय.

    ....म्हणून आज मनपा सभेत सहा/सात विषय समित्यांचे सदस्य जाहीर झाले. पण परिवहन समिती जाहीर केली नाही. सत्ताधार्‍यांकडे बाहुबली बहुमत, पण कुणामध्येच नाही एकमत! त्यामुळे मनपा परिवहन खात्याची जी अवस्था तीच परिवहन समितीची होईल का?

   नवीन इले.बसगाड्या केंद्र सरकारच्या योजनेतून येणार आहेत, त्याकडे इच्छुकांचे आहे लक्ष. पूर्व भागातील मंडल अध्यक्ष नागेश सरगम यांची या समितीवर चेअरमनपदी वर्णी लागेल, अशी चाय पे चर्चा जोरात सुरू आहे. पण.. प्रत्येक वेळी माशी कुठे शिंकते..?

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow