अपेक्षेप्रमाणे कोंड्याल यांच्याच गळ्यात महापौरपदाची माळ
देवकर यांना उपमहापौरपदाचे सरप्राईज गिफ्ट, आता लक्ष्य बिनविरोध निवडीकडे?
(विजयकुमार पिसे)
जय भाजपा, तय भाजपा ही टॅगलाईन चालवली जाते. आणि अंतिमत: फैसला असाच होतो. याची प्रचिती नगरपालिका, पाठोपाठ महापालिका निवडणुकीत आली आहेच. महापौर कोण होणार म्हणून माध्यमांनी अनेक अंदाज चालवून पाहिले. पण..। आणि अपेक्षेप्रमाणे विनायक कोंड्याल यांच्याच गळ्यात महापौर पदाची माळ पडणार हे नक्की झाले.
सोमवारी कोंड्याल यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला. तर प्रथमच निवडून आलेल्या विजयपूर रोड भागातील नगरसेविका ज्ञानेश्वरी देवकर यांना उपमहापौरपदाचे सरप्राईज गिफ्ट मिळाले. येत्या 6 फेब्रुवारी रोजी त्यांच्या निवडीवर मोहोर उमटविली जाईल.
2 फेब्रुवारी रोजी सकाळी भाजपाकडून कोंड्याल आणि देवकर यांच्या नावाची घोषणा महापालिका सभागृहात झाली. याप्रसंगी शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, गटनेते नरेंद्र काळे, कार्यालयमंत्री श्रीहरी म्याकल उपस्थित होते. नगरसचिव कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार महापौर पदासाठी भाजपाकडून विनायक रामकृष्ण कोंडयाल आणि उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी महेश देवकर तर शिवसेनेचे प्रियदर्शन साठे तसेच एमआयएमचे तौफीक हत्तुरे आणि उपमहापौर पदासाठी सेनेचेच प्रियदर्शन साठे आणि आसीफ शेख (एमआयएम) असे सात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी या सर्वांचे उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले.
कोंड्याल प्रभाग 12 मधून विजयी झाले आहेत. 2007 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले. गतवेळी त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. यंदा भाजपात प्रवेश करून सलग चौथ्यांदा विजय संपादन केला. यापूर्वी त्यांनी मनपा स्थायी समिती सभापती पद भूषविले आहे. तर ज्ञानेश्वरी देवकर या प्रथमच निवडून आल्या आहेत. त्यांचे पती महेश मंडल अध्यक्ष आहेत.
महापौरपद खुल्या प्रवर्ग निघाल्यामुळे ओबीसी किंवा अन्य आरक्षित प्रवर्गाला संधी न देता खुल्या गटासाठी संधी द्यावी, असा आग्रह होता. अनंत जाधव यांना संधी मिळावी,यासाठी 1993 चा दाखला दिला होता. मनोहर सपाटे नंतर गेल्या 32 वर्षात मराठा समाजाला संधी मिळाली नाही, याकडे लक्ष वेधले होते. पण या दरम्यान काँग्रेस व राष्ट्रवादी यांचीच सत्ता होती. शिंदे व पवार या नेत्यांनीही मराठा समाजाला का डावलले? त्यामुळे भाजपाने ही कसर भरून काढावी यासाठी मराठा समाजातून गेले आठवडाभर मोहीम उघडली गेली होती. अखेर ती फलद्रुप झाली नाही. त्यामुळे नाराज मराठा समाजाला कदाचित स्थायी समितीवर संधी दिली जाईल, असे मानले जाते.
मात्र *जय भाजपा आणि तय भाजपा* ही टॅगलाईनच खरी ठरते. बाकी अंदाजपंचे नावे चर्चेत आणली जातात. चालवली जातात. ते एक्झीट पोलप्रमाणे फोल ठरतात. देशभरापासून ते स्थानिक पातळीवरील माध्यमांची नेहमीच फसगत होते. याबाबतीतही तोच अनुभव.
What's Your Reaction?





