आरटीओच्या रेटकार्डची 'डीपीसी'त चर्चा
वसुली मोहीम आमदार, खासदारांच्या निशाण्यावर; शेतकऱ्यांची वाहने न अडविण्याच्या सूचना

सोलापूर : आम्ही आमदार आहोत?, तुम्ही आणि तुमचे अधिकारी आमचा फोनही घेत नाहीत. ई-चालन फाडल्यावर परत काही करता येत नसल्याचे सांगता ?, जड वाहतुकीत तुम्ही काय करता ? याच्याशी आम्हाला 'देणं घेणं' नाही. शेतमाल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांची वाहने अडवू नका, अशी सूचना आमदार सचिन कल्याणशेट्टी, अभिजित पाटील, आमदार समाधान आवताडे यांनी केली.
वाहनांसाठी आरटीओंनी केलेले रेटकार्ड, पासची चर्चा आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाली.
आमदारांच्या प्रश्नांची तीव्रता पाहून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांना उत्तर देण्यास उभा केले. नेरपगार यांनी इतर माहिती देण्यास सुरवात केली असता विषय फक्त शेतकऱ्यांची लहान वाहने धरण्याचा आहे, तेवढेच बोला, बाकीचे बोलू नका, असे पालकमंत्री गोरे यांनी सुनावले. शेतकऱ्यांची वाहने अडवू नका, जेवढं सांगितलंय तेवढंच करा, बाकीचं काढलं तर तुमचा कार्यक्रम होईल, अशी टीप्पणी पालकमंत्री गोरे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी नेरपगार यांच्या बद्दल केली. आमदार अभिजित पाटील म्हणाले, ग्रामीण भागातून शेतमाल घेऊन जाणाऱ्या (तरकारी) पीकअपसाठी १५०० रुपयांचा हप्ता घेतात. हा हप्ता न देणाऱ्या वाहनांमधील इतर त्रुटी काढून जास्तीचा दंड आकारला जातो. या विषयात जास्त उकरलं तर अडचण होईल.
What's Your Reaction?






