व्हेंटिलेटर बंद पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी केला आरोप
सिव्हिल हॉस्पिटलच्या बी ब्लॉकमधील ट्रॉमा आयसीयूमधील घटना

सोलापूर : सिव्हिल हॉस्पिटलमधील ट्रॉमा आयसीयूत उपचार सुरू असताना शुक्रवारी (१६ मे) पहाटे व्हेंटिलेटरचे स्वीच अचानक बंद झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान हॉस्पिटल प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप करत मृत महिलेच्या नातेवाइकांनी संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. तसेच मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
कमल तानाजी सरडे (वय ७५ रा. इंगळगी ता द. सोलापूर) अये मयत महिलेचे नाव आहे. मेंदूत रक्तस्राव झाल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर पुढील उपचार करण्यासाठी या महिलेला सिव्हिल रुग्णालयात ११ मे रोजी दाखल केले होते. त्या महिलेवर बी ब्लॉकमधील ट्रॉमा आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. १६ मे च्या पहाटेच्या सुमारास ट्रॉमा आयसीयू मधील त्या महिलेचा व्हेंटिलेटरचा स्वीच अचानक बंद पडला. मात्र डॉक्टरांच्या लक्षात आले नाही. त्या ठिकाणी असलेल्या महिलेच्या नातेवाइकांनी ही बाब डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी
दुसरा व्हेण्टीलेटर लावेपर्यंत त्या महिलेचा जीव गेला होता. डॉक्टरांनी लागलीच ईसीजी करून घेतला, मात्र तोपर्यंत महिलेचा जीव गेला होता. जीवरक्षक प्रणाली बंद पडल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकुर यांच्याकडून दैनंदिन पाहणी केली जात आहे. त्यातच या प्रकार घडल्याने गोंधळ उडाला आहे.
सिव्हिलमध्ये १६० व्हेंटिलेटर उपलब्ध
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या पेशंटची संख्या जास्त आहे. सिव्हिल प्रशासनाच्या माहितीनुसार रुग्णालयात एकुण १६० व्हेंटिलेटर आहेत, सर्व चालू स्थितीत आहेत. ऑक्सिजनचाही तुटवडा नसून मुबलक प्रमाणात आहेत. ऑक्सिजन प्लांट ही कार्यरत आहे.
डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी
उच्च रक्तदाब झाल्याने ब्रेन हॅमरेज झाले होते. सिव्हिलमध्ये उपचार करण्यासाठी दाखल केले होते. वार्डात उपचार सुरु असताना रात्रीच्या वेळी व्हेंटिलेटर बंद असल्याने आईचा मृत्यू झाला आहे. याला नाईटशिफ्टमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर व कर्मचारी जबाबदार आहेत. त्याच्यावर कारवाई करावी.
मनोज सरडे, मृत महिलेचा मुलगा
त्रिसदस्यीस समिती करणार चौकशी
त्या महिलेच्या नातेवाइकांनी लेखी तक्रार दिली आहे. त्यानुसार त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे, त्यानुसार चौकशी करून कारवाईसाठी अहवाल अधिष्ठाता यांच्याकडे पावण्यात येणार आहे.
- डॉ. संतोष भोई, वैद्यकीय अधिक्षक, सिव्हिल हॉस्पिटल
What's Your Reaction?






