हरिभाऊ बागडे राज्यपाल झाल्याने इच्छुकांना मोकळा झाला मार्ग
भाजपने वयाचे गणित मांडल्यानंतर पहिल्या फळीतील अनेक नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत, हे स्पष्ट झाले होते. हरिभाऊ बागडे यांनी सुद्धा त्यावर प्रतिक्रिया दिली होती. पुढील आमदारकीची निवडणूक लढणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

भाजपने गेल्या निवडणुकीनंतर ज्येष्ठ नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात न उतरविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर अनेक राज्यातील निवडणुकीत आणि लोकसभेत त्याचा प्रत्यय आला. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने अनेक राज्यातील राज्यपालांची खांदेपालट केली. तर काही ठिकाणी ज्येष्ठांची वर्णी लावली. त्यात ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांना राजस्थानची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या फुलंब्री मतदारसंघात आता इच्छुकांमध्ये तिकीटासाठी काँटे की टक्कर दिसणार आहे.
फुलंब्रीचे दोन्ही दावेदार बाजूला
फुलंब्री मतदारसंघात भाजपकडून बागडे नाना आणि काँग्रेसकडून डॉ. कल्याण काळे असा दमदार सामना रंगला आहे. विधानसभा निवडणुकीत कल्याण काळे यांनी बागडे नाना कडवे आव्हान दिले. पण त्यांचा पराभव झाला. नुकत्याच झालेल्या जालना लोकसभा निवडणुकीत डॉ. कल्याण काळे हे जायंट किलर ठरले. त्यांनी या मतदारसंघात माजी खासदार रावसाहेब दानवे यांचा पराभव केला. काळे खासदार झाले. त्यांचा फुलंब्री विधानसभेवरचा दावा आपोआप संपला. तर आता बागडे नाना यांना पण राजस्थानच्या राज्यपाल पदाची जबाबदारी दिल्याने या दोघांचा या मतदारसंघावरील थेट दावा बाजूला पडला.
कोण आहेत इच्छुक
भाजपकडून अनुराधा चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ, विजय औताडे, राधाकिसन पठाडे, प्रदीप पाटील, काँग्रेसकडून विलास औताडे, जगन्नाथ कळे, विश्वास औताडे, संदीपराव बोरसे, तर शिंदे गटाकडून किशोर बलांडे, रमेश पवार, राजेंद्र ठोंबरे, शरद पवार गटाकडून राजेंद्र पाथ्रीकर, अजित पवार गटाचे नितीन देशमुख यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.
शपथविधी कधी होणार.
२९ जुलै रोजी मुंबईला जाणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, तेथेच राजस्थान राजभवनमधील अधिकारी येतील. त्यांच्याशी चर्चा होईल. त्यानंतर पुढील कार्यक्रम काय असेल ते कळेल. शपथविधीबाबत अजून काही माहिती नाही, असे बागडे म्हणाले.
दुसरे राज्यपाल.
मराठवाड्यात यापूर्वी शिवराज पाटील-चाकूरकर यांची २०१० साली पंजाबच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी आ. बागडे यांच्या रूपाने विभागाला घटनात्मक अशा राज्यपालपदावर नियुक्ती मिळण्याची संधी मिळाली आहे.
What's Your Reaction?






