हर्षवर्धन ते आणि हे....
हर्षवर्धन ते आणि हे....

हर्षवर्धन सपकाळ प्रदेश काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार घेतला. सपकाळ यांचे नाव जेव्हा जाहीर झाले, तेव्हा कोण हे हर्षवर्धन सपकाळ असा प्रश्न अनेक काँग्रेसींनाही पडला. (मोठा धक्का माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बसला) त्यांचा बायोडाटा बाहेर पडला, तेव्हा कळाले. हे बुलढाणा जिल्ह्यातील माजी आमदार. काँग्रेसमध्येही सामान्य कार्यकर्त्यांची (गांधी परिवारनिकट)दखल घेतली जाते. त्यामुळे श्रेष्ठींचे आणि सपकाळ यांचे अभिनंदन. मावळते अध्यक्ष पटोले यांच्या ना...ना... पाढ्याने बहुतेकजण दुखावले असतील. पण महाविकास आघाडी नेते ना...ना... गेल्यानंतर सुखावले असतील. (विशेष बाब संजय राउत). सपकाळ यांच्या नियुक्तीनिमित्त राजकीय क्षेत्रात आणखी दोन हर्षवर्धनचे स्मरण क्रमप्राप्त.
दुसरे आहेत इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आणि कन्नडचे माजी आ. हर्षवर्धन जाधव. 15,20 वर्षापूर्वी हर्षवर्धन पाटलांचे नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या यादीत टॉपवर होते. 1995 मध्ये अपक्ष आमदार निवडून आल्यानंतर 2014 पर्यंत तब्बल 19 वर्ष हर्षवर्धन पाटलांच्या अंगावर मंत्रिपदाचे जॅकीट होते. सीएम कुणीही झाले तरी मंत्री म्हणून त्यांचे नाव यादीत हमखास. सर्व पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध. विशेषत: थेट अमित शाहांपयर्र्र्ंत. राजकारणातले दादा अजीतदादांनी त्यांचा नक्षा उतरविला. 2004 पयर्र्र्ंत अपक्ष, 2009 काँग्रेस, 2019 भाजपा आणि 2024 शरद पवार काँग्रेस असा राजकीय प्रवास. अपक्ष म्हणूनच त्यांची चलती होती. पण काँग्रेसी नेत्यांना ते अधिक जवळचे होते, कारण बारामतीशी पंगा घेणारा खमका नेता. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती करावी, हा अनेकांचा तर्क. पण बारामतीनेच त्यांना चीतपट केले. लोकसभा निवडणुकीत सुप्रियाताईंना पुरेशी मदत केली नाही, म्हणून अजीतदादांनी खेळपाणी केला, तरीही साहेबांनी गोंजारले. कारण 2024 च्या विधानसभा निवडणुकीत वारे शरद पवारांकडे वाहात होते. बारामतीशी पंगा घेणारा नेता, बारामतीकरांनाच हवा होता. पण झाले उलटे. भरणे मामांनी दादांच्या मदतीने तिसर्यांदा इंदापुरात भंडारा उधळला. आता हर्षवर्धन पाटील ना इकडले ना तिकडले झाले. भाजपात असते तर? त्यांना शांत झोप तरी लागली असती ना।
ताजा कलम...छत्रपती संभाजीनगरकडले एक हर्षवर्धन जाधव कन्नडचे माजी आमदार. तूर्तास सरकारी पाहुणचार घेताहेत. हे हर्षवर्धन नेहमीच वाद ओढून घेतात आणि चर्चेत राहतात. 2014 मध्ये उध्दव ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण प्रकरणातील खटल्यात गैरहजर राहिल्याबद्दल कोर्टाने पकड वॉरंट काढले. नागपुरात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. हर्षवर्धन जाधव भाजपा नेते रावसाहेब दानवेंचे जावई. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पत्नी संजना जाधव (शिंदे सेना) यांनी पती हर्षवर्धन जाधवांचा पराजय केला. महाराष्ट्रातील तीन हर्षवर्धन आणि त्यांच्या तीन तर्हा.
What's Your Reaction?






