श्री सिध्देश्वर महाराजांच्या समाधीस तिरंगा ध्वजाची आकर्षक प्रतिकृती…
श्रावणातील दुसऱ्या सोमवारी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लक्षवेधी सजावट

सोलापूर – ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्देश्वर महाराजांच्या मंदिरात पवित्र श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू आहे. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी श्री शिवयोगी सिध्देश्वर महाराजांच्या समाधीस फुलांची सजावट करण्यात कारागीर व्यस्त आहेत. यंदा मेघडंबरीस तिरंगा ध्वजाची लक्षवेधी प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात दरवर्षी श्रावण महिन्यात धार्मिक विधी कार्यक्रम ओम नमः शिवाय जप आणि बिल्वाअर्चना होत असते. शहरातील तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त दर सोमवारी श्रींचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात येत असतात.
याच पवित्र श्रावणात श्रींच्या समाधीस दरवर्षी वेगवेगळी सजावट साकारली जाते. पहिल्या श्रावण सोमवारी फुलांची भव्यदिव्य सजावट करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या श्रावण सोमवारी समाधीवर तिरंगा ध्वजाची मेघडंबरी साकारण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा ध्वज साकारण्यात आला आहे. ही नाविन्यपूर्ण सजावट करण्यासाठी सुमारे दहा मुस्लिम कारागीर दिवस रात्र परिश्रम घेत असल्याचे दिसत आहे.
दर सोमवारी प्रत्येक भक्तगण या सजावटीच्या माध्यमातून अनोखी सेवा श्रींचरणी अर्पण करत असतो. या सोमवारी देखील पांढरी शेवंती , पिवळी शेवंती, जांभळी शेवंती, निशिगंध, पिवळा झेंडू, लाल झेंडू , अश्टर, पांढरा फोम, लोखंडी अँगल या सर्वांच्या माध्यमातून सदरची वैविध्यपूर्ण सजावट साकारलेली आहे. ही सजावट साकारण्यासाठी संपूर्ण दिवस आणि रात्र यांचा कालावधी लागतो आहे. सुमारे हजारहून अधिक किलोची फुले यासाठी वापरली जातात.
मेघडंबरीस स्वातंत्र्य दिनाचे मुख्य आकर्षण…
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन दृष्टीक्षेपात आला आहे. त्या अनुषंगाने भक्तगण मोठ्या प्रमाणात मंदिरामध्ये श्रींचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. सोलापूर शहर जिल्हा तसेच इतर जिल्ह्यातील आणि राज्यातील भक्तगण येत असल्याने त्यांना श्रींचे सुखद दर्शन व्हावे यासाठी तिरंगा ध्वजाची अनोखी प्रतिकृती यावेळेस मेघडंबरीवर साकारण्यात आली आहे. यासाठी पांढरा, भगवा आणि हिरवा रंगांची फुले वापरण्यात आली आहेत. अँगल आणि फॉर्म यावर सदरची फुले चिटकवण्यात आली आहेत. त्यावर ओम नमः शिवाय , ओम , आणि श्री सिद्धरामेश्वर यांचे स्टिकर लावण्यात आले आहे.
What's Your Reaction?






