आईसह दोन चिमुकल्याचा विहीरीत बुडून मृत्यू
उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी येथील दुर्देवी घटना

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी येथे अज्ञात कारणातून आईने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मृतांमध्ये आईसह पाच आणि दोन वर्षांच्या सख्ख्या भावंडांचा समावेश आहे. ही दुर्देवी घटना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. चित्रा बाबासाहेब हाक्के (वय २८), पृथ्वीराज बाबासाहेब हाक्के (वय ५) आणि स्वराज बाबासाहेब हाक्के (वय २, सर्व. रा. वांगी, ता. उत्तर सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. चित्रा हाक्के या गावापासून जवळच असलेल्या त्यांच्या शेतातील वस्तीवर राहण्यास आहेत. बुधवारी दुपारी १२च्या सुमारास त्या दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडल्या. बराचवेळ त्या मुलांना घेऊन घराकडे परतल्या नसल्याने नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. परंतु त्या दिवसभर त्या कोठे गेल्या हे समजू शकले नाही. दरम्यान सायंकाळी ५.३० वाजता शेतातील वस्तीच्या जवळच असलेल्या विहीरीत एका व्यक्तीला महिला पाण्यावर तरंगताना दिसली. त्या व्यक्तीने तातडीने ही बाब वस्तीवरील व गावातील लोकांना सांगितली. बघता बघता
काही वेळातच लोकांची मोठी गर्दी जमली त्यातील लोकांना तसेच नातेवाईकांना तो मृतदेह चित्रा हाक्के यांचा असल्याचे लक्षात आले. विहीर अरुंद आणि
खोल असल्याने विहिरीत उतरणे लोकांना अडचणीचे ठरत होते. यामुळे सोलापूरातुन अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी विहिरीतील पाण्यातून चित्रा व दोन वर्षाचा बालक स्वराज या दोघांना बाहेर काढले. रात्री उशिरापर्यंत पृथ्वीराज याला बाहेर काढण्याचे काम सुरू होते. या बाबत तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशीरा नोंद करण्याचे काम सुरू होते.
What's Your Reaction?






