अटलजींनंतर नरेंद्र मोदींची संघाच्या स्मृती मंदिराला भेट
देशाच्या दोन पंतप्रधानांचा 25 वर्षानंतर भेटीचा योग, सर्वोच्च पदावरील दोन संघस्वयंसेवक, दोन प्रधानमंत्री

(विजयकुमार पिसे)
भारतरत्न पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर रेशीमबागेतील संघाच्या स्मृतीमंदिरास भेट देणारे देशाचे दुसरे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ठरणार आहेत. उद्या गुढीपाडव्याच्या (30 मार्च) दिवशी मोदी नागपूरला येत असून यानिमित्ताने 25 वर्षानंतर दोन प्रधानमंत्र्यांच्या भेटीचा उजाळा होत आहे. नरेंद्र मोदी यांचे 30 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता नागपुरात आगमन झाल्यावर ते रेशीमबाग येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला भेट देणार आहेत. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
भारतरत्न संघस्वयंसेवक पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 27 ऑगस्ट 2000 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती. अशी भेट देणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान होत. वाजपेयी यांनी स्मृती मंदिरच्या भेटीत आद्य सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले होते. गुढीपाडव्याच्या दिवशी संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांची 136 वी जयंतीदेखील आहे. त्याच दिवशी प्रधानमंत्री मोदी यांच्या भेटीचा योग येत आहे.
*स्वयंसेवक ते पंतप्रधान*
वाजपेयी आणि मोदी संघाच्या मुशीत घडलेले स्वयंसेवक आणि संघ प्रचारक देखील. आपल्या कर्तृत्वाने देशाच्या अत्युच्च पदावर पोहोचले. अटल बिहारी वाजपेयी हे स्वतंत्र भारताच्या दुसर्या लोकसभेत भारतीय जनसंघाच्या निवडून आलेल्या चार खासदारांपैकी एक होते. वाजपेयी यांचा तो प्रतिकूल काळ होता. लोकसभेत दोन सदस्यांवरून 325 खासदारांपयर्र्त भाजपाची झेप आहे. वाजपेयी आणि मोदी यांची जडणघडण संघाच्या मुशीतच झाली आहे. वाजपेयी तीन वेळा पंतप्रधान झाले. 1996 मध्ये फक्त 13 दिवसांचे पंतप्रधान व 1998 ते 1999 पर्यंत 13 महिन्यांचे पंतप्रधान होते. 1999 च्या मध्यावधी निवडणुकीनंतर 2004 पर्यंत 5 वर्षांसाठी देशाचे पंतप्रधान म्हणून स्थिर सरकार दिले होते. 27 ऑगस्ट 2000 रोजी त्यांनी नागपुरातील संघाच्या स्मृतीमंदिराला भेट दिली होती. यावेळी त्यांच्या समवेत देशाचे गृहमंत्री लालकृष्ण अडवानी, प्रमोद महाजन, अरुण जेटली, सुषमा स्वराज आदी मंत्रिसदस्य उपस्थित होते.
*प्रचारक, सीएम ते पीएम*
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, प्रचारक ते पंतप्रधान असा मोदींचाही प्रवास आहे. 2014, 2019 आणि 2024 सलग तीन वेळा मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत. लोकसभेच्या तीनही निवडणुकांमध्ये मोदी यांना पूर्ण बहुमत मिळाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली देशात भाजपाचे स्थिर सरकार आहे. अन्य पक्षांसोबत स्थिर सरकार देण्याचा प्रयोग अटलजी आणि मोदी यांनी यशस्वी करून दाखवला आहे. प्रधानमंत्री होण्याआधी मोदी 2002 ते 2014 पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सलग बारा वर्षे कामगिरी पाडली होती. पक्ष संघटनेत प्रदीर्घ कामाचा अनुभव असलेले मोदी यांना अनपेक्षितपणे गुजरातेत पाठवून संघटनेने धक्का दिला होता. आणि मुख्यमंत्री म्हणूनही मोदी यांनी प्रभाव निर्माण केला. तो अनुभव प्रधानमंत्री मोदी यांच्या पाठिशी आहे. शिवाय देश विदेशातही मोदी यांची वेगळी छाप आहे.
30 तारखेला नागपुरात द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या स्मृत्यर्थ माधव नेत्रालयाच्या विस्तारीत इमारतीचा पायाभरणी होणार आहे. याच दिवशी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांची जयंती आहे. मोदी नागपुरात आल्यानंतर सर्वप्रथम स्मृती मंदिराला भेट देणार आहेत. माधव नेत्रालय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्यांच्यासमवेत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत हे देखील उपस्थित राहणार आहेत.
What's Your Reaction?






