दक्षिण सोलापुरात एकाकी ठाकरेंची मशाल
सेनेच्या सांगली पॅटर्नला सोलापुरी पॅटर्नचा धक्का

(विजयकुमार पिसे)
सोलापूर : सांगली पॅटर्नमुळे त्याचा फास त्यांच्याच म्हणजे ठाकरे सेनेलाच बसला. असाच प्रयोग विश्वप्रवक्ते रौतांनी दक्षिण सोलापुरातही केला. पण या मतदारसंघात महाविकास आघाडीने ठाकरेंच्या मशालीस वार्यावर सोडले असून मशाल एकाकी फडफडत आहे. त्यांची ही तडफड बघवेना. कारण मविआच्या शिंदे-पवार यांच्या खेळीमुळे अपक्ष धर्मराज काडादी वरचढ ठरले आहेत. त्यांच्या कॉम्प्युटरचा सर्व्हर डाउन झाला तरच मशालीच्या धगीची अन्य उमेदवारांना झळ बसणार आहे. शिवसेना एकाकी लढत असून मविआतील घटक पक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादीचे बहुसंख्य नेते मंडळी ठाकरे सेनेलाच लक्ष्य करीत आहेत.
ठाकरे सेनेचे अमर पाटील युवा उमेदवार हे नवमतदारांचे खऱे तर आकर्षण. या मतदार संघात अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांचे उमेदवार बहुसंख्येने आहेत. त्यामुळै मतविभागणी अटळ आहे. खरी लढत भाजपा आणि ठाकरे सेना अपेक्षित आहे. जर मविआ एकत्रित आली तर भाजपाचे आ.सुभाष देशमुख जेरीस येवू शकतात. पण मविआची सगळी टीम काडादींसोबत जोमात असून ठाकरेंची मशाल कोमात गेली काय, अशी चर्चा आहे. याशिवाय काँग्रेसचेच बंडखोर बाबा मिस्त्री यांची बॅट चौफेर "प्रहार" करीत आहे. तसेच लिंगायत बहुल मतदारसंघात मनसेचे महादेव कोगनुरे, अपक्ष सोमनाथ वैद्य यांच्यामुळे मविआच्या मतांची फाटाफूट भाजपाच्या पथ्यावर पाडण्याची शक्यता आहे.
सांगलीत ठाकरे सेनेने ती जागा काँग्रेसची असताना परस्पर उमेदवार जाहीर केला. तसाच प्रयोग दक्षिण सोलापुरातही केला. सेनेने मविआला विश्वासात न घेताच अमर पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. या ठिकाणी काँग्रेसचे दिलीप माने यांची उमेदवारी अंतिमत: निश्चित होती. पण दिलीप माने यांना दक्षिण तालुक्यातील लिंगायत समाजाच्या नेत्यांनी विरोध करून काडादींना अपक्ष उमेदवारी भरण्यास बाध्य केले. ही कोंडी सोडवण्यासाठी काँग्रेसचे तगडे उमेदवार दिलीप माने यांना माघार घेण्यास भाग पाडले. त्यामुळे काडादी यांची अपक्ष उमेदवारी मविआतील घटक पक्ष ठाकरे सेनेचे अमर पाटील यांच्यासाठी मोठा अडथळा ठरत आहे. राज्यात सांगली पॅटर्नमुळे मशालीस फटका बसला. तिथे अपक्षेप्रमाणे पराभव स्वीकारावा लागला. इथेही ह्याच सांगली पॅटर्नवर मविआचा सोलापुरी पॅटर्न वरचढ ठरत आहे. काँगेस आणि शरद पवारांच्या पक्षाचा एक़ही नेता मशालीकडे फिरकला नाही.
*ठाकरी इशारा, तरीही प्रणितीताई....*
उध्दव ठाकरे सोलापुरातील प्रचार सभेत खा. प्रणिती शिदे यांना लोकसभेचे स्मरण करून दिले. त्यानंतरही ताई दक्षिण सोलापुरात मशालीच्या प्रचारात सहभागी झाल्या नाहीत. ना आघाडीचे शीर्षस्थ नेतेेमंडळी. उद्या सोमवारी प्रचाराचा शेवट आहे. येत्या 36 तासात मविआने ठाकरे सेनेचा प्रचार केला नाही, तर शिवसैनिकांना वेगळा विचार केल्याशिवाय पर्याय नाही.
What's Your Reaction?






