माजी मंत्रीपुत्र शिवराज म्हेत्रेे अडचणीत

इंडियन बँकेची पुण्यातील प्रॉपर्टीवर कारवाई, गोकुळ शुगरचे 27.41 कोटींचे कर्ज प्रकरण

Feb 5, 2025 - 19:42
 0  844
माजी मंत्रीपुत्र शिवराज म्हेत्रेे अडचणीत
संग्रहित छायाचित्र

(विजयकुमार पिसे)

अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष आणि माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचे पुत्र शिवराज म्हेत्रे अडचणीत आले असून मे. गोकुळ शुगरच्या 27.41 कोटींचे कर्जप्रकरणी म्हेत्रे यांच्या पुण्यातील प्रॉपर्टीवर इंडियन बँकेने कारवाई केली आहे. मातोश्री लक्ष्मी शुगरवर पंजाब बँकेच्या कारवाईनंतर म्हेत्रे परिवारावर कारवाईचे हे दुसरे प्रकरण आहे.   

   गोकुळ शुगरमध्ये माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे आणि राष्ट्रवादीचे गोकुळ शिंदे परिवारातील 15 सदस्य संचालक असून 3 एप्रिल 2017 मध्ये इंडियन बँकेने नोटीस बजावली होती. आठ वर्षानंतरही कर्जफेड न झालेमुळे बँकेने कर्जदार/गहाणखतदार/जामीनदार यांनी रक्कम परत करू शकले नाहीत म्हणून 31 जानेवारी 2025 रोजी शिवराज म्हेत्रे यांच्या पुण्यातील स्थावर मालमत्तेचा ताबा घेतला आहे. बँकेचा 35 कोटींचा बोजा आहे. त्यामुळे पुण्यातील प्रॉपर्टीचा कुणीही व्यवहार करू नये असे कळवले आहे. पुण्यातील पिंपळे निलख येथील बी ओव्हळ स्प्रिंग मध्ये 1234 चौ. फुटाचा फ्लॅट आहे. तसेच याच ठिकाणी 1593 चौ.फुटाचा फ्लॅट आहे. पाषाण भागात हेरंब अपार्टमेंटमध्ये 1959 चौ.फुटाचे रो हाऊस आहे. या तीनही मालमत्ता शिवराज म्हेत्रे यांच्या मालकीच्या असल्याचे बँकेने नमूद केले आहे.

  गोकुळ शुगरच्या कर्ज प्रकरणातील जामीनदारांपैकी आता जवळपास चार जण मयत झाले आहेत. पण त्या मयतांचा बोजा कायदेशीर वारसदारांवर आला आहे. त्यामुळे म्हेत्रे आणि शिंदे परिवारातील जामीनदार वारसांच्या मालमत्ता ताब्यात घेण्याची कार्यवाही इंडियन बँकेने केली आहे. तसेच मातोश्री लक्ष्मी शुगरकडे पंजाब नॅशनल बँकेची 75 कोटी 69 लाख रुपयांची थकबाकी असून यापोटी बँकेने म्हेत्रे आणि शिंदे परिवार यांच्या अक्कलकोट आणि सोलापूर येथील प्रापर्टीचा प्रतीकात्मक ताबा यापूर्वीच घेतला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow