१०वी भूगोल पेपर फुटला, तरीही आज होणार परीक्षा, २अधिक़ारी निलंबित
सांगोला केंद्रातून 50 प्रश्नपत्रिकांची स्ट्राँग रूममधून चोरी, प्राचार्य गायकवाड आणि गटशिक्षण अधिकारी नवले निलंबित, कॉपीमुक्त परीक्षा योजनेत प्रशासनाचा भंपकपणा, सीसीटीव्ही बंद, चोरीचे फुटेजही नाही
सोलापूर : कॉपीमुक्त परीक्षा असे प्रशासन ढोल बडवून सांगत असले तरी प्रशासन किती भंपक आहे. हे 10वीच्या 50 प्रश्नपत्रिका चक्क चोरांनी डल्ला मारल्यानंतर उघडकीस आले. या सार्या गोंधळावर पडदा टाकण्यासाठी तातडीने नवीन प्रश्नपत्रिका तयार करून आज बुधवारी ठरल्याप्रमाणे 10वी भूगोलाचा पेपर होणार,असे प्रशासनाने जाहीर केले. पण या निमित्ताने प्रशासनाचे वाभाडे निघाले आहेत. 10 पेपर फुटल्यामुळे परीक्षेचे गांभीर्य आणि गोपनीयतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान पुणे दहावी बोर्डाच्या अध्यक्षांनी या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवला. आणि चौकशीअंतर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे प्राचार्य अमोल गायकवाड आणि प्रभारी गटशिक्षण अधिकारी सुयोग नवले यांना निलंबित केले आहे.
दरम्यान, हा पेपर रद्द होणार की नवीन प्रश्नपत्रिका संच पुरवणार, याबाबत शिक्षण मंडळाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नव्हता. सकाळी 8.30 वा. शिक्षण विभाग व कस्टोडियन उरलेले पेपर बोर्डाला पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यासाठी आले असता त्यांना स्ट्राँग रूमचे कुलूप तोडल्याचे दिसले. तेव्हा ही चोरी उघडकीस आली. या स्ट्राँग रूम समोरील सीसीटीव्ही सध्या बंद आहे. त्यामुळे या चोरीचे कोणतेही फुटेज उपलब्ध नाही.
प्राप्त माहितीनुसार दहावीच्या प्रश्नपत्रिका स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित होत्या. पण अज्ञात चोरट्यांनी या रूमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांवर डल्ला मारला. मंगळवारी सकाळी केंद्र कर्मचार्यांच्या ही बाब लक्षात आली, तेव्हा धावपळ उडाली. स्ट्राँग रूमसारख्या ठिकाणी ही चोरी झाल्याने शिक्षण मंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत. मात्र यावर पांघरूण घालण्यासाठी आजच दहावी भूगोलाचा पेपर होणार असल्याचे समजते.
What's Your Reaction?