फडणवीसांच्या परिवार विरोधाला देवाभाऊ समर्थकांकडूनच हरताळ
भाजपा आणि अन्य पक्षांमध्येही हीच तर्हा, आयारामना पुन्हा रेडकार्पेट,पक्षात न येताच दिली उमेदवारी, मनपाची पुनरावृत्ती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही
(विजयकुमार पिसे)
महापालिका निवडणूक आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत नेत्यांच्या परिवार विस्ताराविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी असावी. फडणवीस जाहीरपणे म्हणाले होते,नेत्यांच्या आणि आमदार,खासदारांच्या परिवारातील सदस्यांना उमेदवारी नाही. नरेंद्र मोदी घराणेशाहीवर सडेतोड बोलतात. भाजपात मात्र प्रत्यक्षात कृतीशून्य धोरणाचा अनुभव येत आहे. विशेष म्हणजे देवाभाऊ समर्थकांकडूनच यास हरताळ फासला जात असल्याचे मत उमेदवारी डावलले गेलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
फडणवीसांच्या घोषणेनंतर नाशिकात स्थानिक नेत्यांनी आपल्या कुटुंबियांच्या सदस्यांची उमेदवारी मागे घेतली. अपवाद सुधाकर बडगुजर यांचा. धाराशिवमधून अर्चना पाटील यांनीही माघार घतली.सोलापुरात आ.सुभाष देशमुखांचे सुपुत्र मनीष यांच्या उमेदवारीची चर्चा होती. पण सुभाषबापूंनी प्र.24 मध्ये पुत्र मनीषऐवजी नरेंद्र काळे यांना संधी दिली. बाकी निवडून आलेल्या 87 नगरसेवकांच्या यादीवर नजर टाकली तर नेत्यांचा परिवारविस्तार दिसतो. आता अशा परिवार विस्तारालाच महापालिकेत महापौर,सभापती या पदांची खैरात होणार अशीही चर्चा आहे. महापालिका निवडणुकीसाठी तिकीट वाटपाचे सूत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही दिसले. या प्रक़ाराने अनेक निष्ठावंत नेते पदाधिक़ारी यांनी अशा निवडणूक प्रक्रियेतून पाय मागे घेतले. शहर अध्यक्ष आणि जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदावर केवळ नामधारी बसवलेत का? अशी चर्चा आहे.
भाजपा काँग्रेस एकाच नाणेचे दोन बाजू
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तिकीट दिलेल्या उमेदवारांची यादी पाहिली तर लक्षात येईल की भाजपा आणि काँग्रेस तसेच अन्य पक्ष हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुतेे दहिगाव गट (माळशिरस),दिलीप माने पुत्र पृथ्वीराज माने कोंडी गट (उत्तर सोलापूर), माने यांचे बंधू जयकुमार सोलापूर मनपा प्र.26 मधून नगरसेवक. शिवाजी सावंत यांचे पुत्र पृथ्वीराज मानेगाव गट (माढा).तसेच परंडा तालुक्यातही सावंत परिवारातील सदस्य निवडणूक़ रिंगणात आहे. शहाजी पवार यांचे बंधू इंद्रजित बीबी दारफळ गट (उत्तर सोलापूर), इंद्रजित भाजयुमोचे पदाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी चपळगाव गट, भाऊ सागर वागदरी गट (अक्कलकोट) तसेच नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी चुलत बंधू मीलन कल्याणशेट्टी यांना संधी मिळाली आहे. असाच प्रक़ार राष्ट्रवादी श.प. आणि अजीतदादा गटातही आहे.आ.उत्तम जानकरांची मुलगी ज्योती व मुलगा जीवन, अजीतदादा गटाचे अध्यक्ष उमेश पाटील स्वत: कुरुल गट व बंधू संतोष पाटील नरखेड गट, तसेच माजी आ.दीपकआबा साळुंके यांचे पुत्र यशराज,मोहिते पाटील परिवारातील दोन सदस्य अर्जुनसिंह व वैष्णवीदेवी हे पतीपत्नी माळशिरस तालुक्यातून कौल अजमावणार आहेत. इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता, मंत्री दत्ता भरणे यांचे पुत्र हे देखील जि.प.,पं.स.निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसमध्ये हीच परंपरा होती, आहे. त्याची लागण भाजपातही झाली आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये काही फरक राहिला का? असा प्रश्न उपस्थित केला जातो.
What's Your Reaction?





