स्मशानभूमीच्या जागेबाबत आम्ही समतोल साधतोय : महापौर
मनपा सभेत सभासद प्रस्ताव मान्य केला आहे, मात्र आयुक्तांकडून विखंडनाचा व नव्याने टेंडर मागवण्याचा प्रस्ताव : महापौर कोंड्याल यांची माहिती
(विजयकुमार पिसे)
लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेबाबत आम्ही समतोल साधण्याचा प्रयत्न करतोय. मनपा सभेत नगरसेवकांचा प्रस्ताव, आयुक्तांचा मूळ ठराव मान्य असा होता, तोच ठराव केला आहे. मात्र आयुक्तांकडून विखंडनाचा व नव्याने टेंडर मागवण्याचा प्रस्ताव आला होता, अशी माहिती महापौर विनायक कोंड्याल यांनी *लक्ष्यवेध न्यूजशी बोलताना दिली.
यासंदर्भात कोंड्याल म्हणाले, आम्ही नवीन काही केलेले नाही. प्रशासकीय काळात 2 एकर जागा सिध्देश्वर देवस्थानला देण्याविषयी आयुक्त यांनी ठराव केला होता. आता त्यांनी दबावाखाली विखंडनासाठी नवा प्रस्ताव पाठवला आहे. शिवाय नव्याने टेंडर पध्दतीने प्रस्ताव मागवावा असे आयुक्त प्रस्तावात म्हणतात. यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र मी नव्याने निर्णय काहीच घेतलेला नाही. चुकीचे काही केलेले नाही. जुळे सोलापूर व विजापूर रोड भागात लिंगायत समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे त्या भागात होटगी मठाला जागा देण्याची आमची भूमिका असून ठरावात तसे नमूद केले आहे. यातून आम्ही समतोल साधण्याचा प्रयत्न करतोय, असा दावा महापौर कोंड्याल यांनी केला
समन्वय अपेक्षित : मठ आणि मंदिरे तसेच संत,महंत, धर्माचार्य, ह.भ.प. महाराज मंडळी ही हिंदू समाजाची श्रध्दास्थाने आहेत. यामध्ये राजकारण्यांनी राजकारण आणू नये. शिवाय हिंदू समाजात त्यांनी समन्वय आणि ऐक्य साधण्याचा प्रयत्न करावा. विधानसभा (2024) निवडणुकीत संघ परिवाराच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस, गोविंद देव गिरी महाराज, काड सिध्देश्वर महाराज आणि काशी जगद्गुरू तसेच धर्माचार्य यांनी गावागावात जाऊन हिंदू समाजाचे जागरण केले आहे. त्याचे फलित म्हणजे निवडणूक निकालाचे यश समोर आहे. त्यामुळे आता देखील असाच समन्वय असावा, मठ आणि मंदिरात तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी विद्यमान सत्ताधार्यांनी घेतली पाहिजे.
महापौरांकडून आलेले संदर्भ :
1) दि.5।12।2025 देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांचे मनपा आयुक्तांना पत्र. स्मशानभूमीची जागा विकसित करण्यास तयार आहोत.
2) प्रशासनाचा ठराव दि.12।8।2025. दि.11।3।2022 च्या गठीत उपसमितीद्वारे लिंगायत स्मशाभूमीसाठी जागा देण्याची तयारी मनपा प्रशासनाने केली असून ती देवस्थानमार्फत करण्यात येत असल्याने धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
3) दि.4।7।2024 मनपा प्रशासनाचे पत्रात आ.देशमुख यांच्या पत्राचा उल्लेख आहे.
4) दि.5।12।2025 : भूमी मालमत्ता विभागाचे देवस्थानचे अध्यक्ष काडादी यांना पत्र. यामध्ये दि. 12।8।2025 च्या संदर्भाचा उल्लेख क़रून सदरची जागा देवस्थानला देणेस मान्यता दिली असे नमूद आहे. शिवाय दरम्यान अद्याप आपणाकडून कोणतेही लेखी म्हणणे सादर करणेत आलेले नाही. सबब हे पत्र प्राप्त होताच आपले म्हणणे सादर करावे. अन्यथा आपणास स्वारस्य नाही, असे गृहित धरून कार्यवाही करणेत येईल, असे स्पष्टपणे प्रशासनाकडून नमूद केले आहे.
What's Your Reaction?