सुनेत्राताईंकडेंच वारसा,राष्ट्रवादी विलीनीकरणास ब्रेक?

उपमुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवार अनभिज्ञ, सुनेत्रा वहिनीच अखेर लाडकी बहीण! अजितदादा गटाचीही धुरा

Feb 1, 2026 - 10:43
 0  156
सुनेत्राताईंकडेंच वारसा,राष्ट्रवादी विलीनीकरणास ब्रेक?

(विजयकुमार पिसे)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा अखेर पत्नी सुनेत्राताईंकडेच आला. शनिवारी सायंकाळी 5 वा. लोकभवनात त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असून त्याच अखेर लाडकी बहीण ठरल्या आहेत. विशेष म्हणजे ताईंच्या शपथविधीबाबत स्वत: शरद पवार अनभिज्ञ राहिले. त्यामुळे हा निर्णय पवार परिवारात सहमतीने झाला नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे नेत्रा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणास ब्रेक लागला आहे. 

   सुनेत्राताई पवारांकडे आता राष्ट्रीय पक्षाची धुरा देखील सोपविली जाणार असून यामध्ये दादांच्या पक्षातील ओबीसी नेत्यांसह प्रफुल्ल पटेल आणि नरेश आरोरा यांनी पुढाकार घेतला, ही बाब अधोेरेखित झाली आहे.

     उपमुख्यमंत्री पवार यांच्या शपथविधी सोहळ्यास पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हे चार प्रमुख नेते उपस्थित होते. दरम्यान सुनेत्रा पवार यांनी आजच त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. 2024 पासून त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांनी खासदारकी सोडली.

   28 जानेवारी रोजी अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे दादांच्या रिक्त जागेवर सुनेत्राताईंची नियुक्ती करून पवार परिवार, पक्ष आणि नेतृत्व हे तीन लक्ष्य साध्य केले आहेत. तसेच राष्ट्रवादी विलीनीकरणाची शक्यता आता धूसर झाली आहे. पडद्यामागची भूमिका नरेश आरोरा यांनी जशी पार पाडली, त्याचबरोबर भाजपाला अपेक्षित खेळी झाली. त्यामुळे अजितदादांच्या खर्‍या वारसाला न्याय मिळाला आहे. पक्षाला आणि समर्थकांना अपेक्षित असा कौल झाला आहे.

   दरम्यान तत्पूर्वी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक झाली. यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्राताईंच्या नावाचा विधीमंडळ गटनेतेपदाचा प्रस्ताव ठेवला. तो एकमताने मंजूर झाला. या प्रस्तावास छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर लगेचच संध्याकाळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देखील घेतली. घरात मोठी दुखःद घटना घडली असताना केवळ तीनच दिवसांनी शपथविधी घेण्याचा प्रकार सामान्यांना अस्वस्थ करणारा निश्‍चित आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow